पुणे : सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची प्राध्यापीका तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शका डॉ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९), हीने
पीएचडी डीग्रीसाठी प्रबंध सादर करणे आणि त्याला अप्रुव्हल देण्यासाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यातील २० हजार रुपये लाच स्वीकारताना पीएचडी मार्गदर्शक असलेल्या या प्राध्यापिकेला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने शनिवारी (दि. ३०) सांगवी येथे ही कारवाई केली.
एसीबीचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय व्यक्ती प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्र विषयामध्ये पीएचडी डीग्री प्राप्त करून घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे वीद्यापीठाकरीता ऑनलाइन प्रबंध तयार केलेला आहे. हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार प्राध्यापकांचे मार्गदर्शक म्हणून डॉ. शकुंतला माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती झालेली आहे. तक्रारदार प्राध्यापकाने सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे व त्यावर अप्रुव्हल देणे यासाठी डॉ. शकुंतला माने हिने तक्रारदार प्राध्यापकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली.
संबंधित पीडित प्राध्यापकाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने चौकशी केली असता, डॉ. माने हिने लाच मागितल्याचे समोर आले. लाचेच्या २५ हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये लाच स्वीकारल्यावर डॉ. माने हिला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करीत आहेत.