पार्श्वभूमी
मागील काही काळापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. या हल्ल्यात आश्चर्यकारक एक गोष्ट ही आहे की पोलिसांवर हल्ले करणारे हे कुणी आतंकवादी, नक्षलवादी, गँगस्टर, गुंड नसून तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तथाकथित व्यवस्था पोलीस विभागातील प्रत्येक व्यक्तीला आतंकवादी, नक्षलवादी, गुंड यांच्याशी लढण्याचे यांच्याशी सामना करण्याचे, दोन हात करण्याचे प्रशिक्षण दिल्याचा दावा करते परंतु वस्तुस्थिती ही आहे की आज पोलीस विभागातील व्यक्ती हे गावगुंडांचा, नक्षलवाद्यांचा, आतंकवाद्यांचा सोडा सामान्य लोकांचा देखील सामना करू शकत नाही. त्याचप्रमाणे आज सामान्यात सामान्य व्यक्ती पोलिसांवर हात उघडण्याची मानसिकता ठेवतो. मग आतंकवादी, नक्षलवादी, गावगुंड, गॅंगस्टर, अंडरवर्ल्डचे लोक यांचा विचार सोडाच. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पोलीस सामान्य लोकांचा देखील सामना करण्यास अक्षम आहे हे येथे नमूद करावसं वाटतं. चौकात शहराच्या विविध भागात ग्रामीण भागात डोंगरदऱ्यात देखील पोलीस जनसामान्य वाटणाऱ्या या लोकांचा मार खातानाच्या क्लिप बातम्या आपल्याला दिवसाआड पाहायला मिळतात. त्यामुळे काही अतिशय कळीचे प्रश्न येथे उपस्थित होतात आणि ते म्हणजे पोलीस खरंच दुर्बल आहेत का ? आणि आहेत तर का आहेत ? त्यांना दिलं जाणार ट्रेनिंग हे अशा आणीबाणीच्या वेळी का कामी येत नाही किंवा ते कामी आणत नाही, का आजचा पोलीस हा ऑफेन्सिव्हपेक्षा डिफेन्सिव्ह मोड मध्ये अधिक जात चालला आहे. म्हणूनच हा लेख अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न.
1 बदलत चाललेली सामाजिक स्थिती
आज जनतेत शासकीय यंत्रणा सरकार विरोधी मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. अनेक सामाजिक स्तरावरील व्यक्तींना भ्रष्ट होत चाललेल्या यंत्रणे विषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात राग आहे. त्यात बेरोजगारी, गरिबी, उद्याची शास्वती नसणं, सामाजिक स्तरावर आलेले नैरास्य, जातीवाद, प्रांतवाद, धर्मवाद, व्यवसाय वाद यातून वाढत चाललेला ताणतणाव हा सामाजिक एक गढूळ, दूषित आणि असंतोषाचे लोन पसरवतो. अनेक व्यक्तींची मने त्या असंतोषातूनच धगधगत असतात. तो बाहेर काढण्याच्या मानसिकतेत कृती करणारा समाज किंवा व्यक्ती याला सर्वप्रथम प्रतिबंध करण्याचे काम हे पोलिसांनाच करावे लागते. मग त्या व्यक्तीचा राग कुठल्या ही विभागाविषयी, संघटने विषयी, मालका विषयी, घरगुती वादाविषयी असला तरी देखील त्याचा सामना प्रथमतः पोलिसांशी होतो आणि अशा लोकांना कायदा शिकवण्याचे तसेच त्यांच्या समाजविरोधी कृतीला आळा घालण्याचे काम प्रामुख्याने पोलीस करीत असतात. कधी कधी पोलिसांकडून देखील अतिरेक होतो आणि असंतोष अधिक वाढत जातो. जो पोलिसांवरील हल्ल्याच्या कृतीतून सामाजिक स्तरावर पाहायला मिळतो कारण आज समाज समभ्रमित, गोंधळलेला, ताणतणाव युक्त असल्याने हे हल्ले मोठ्या प्रमाणात होतात.
2 पोलिसांना दिल जाणार प्रशिक्षण
सामाजिक स्तरावर अगदी प्रशिक्षणापासून जर कुठल्या विभागात मानसिक खच्चीकरण अथवा स्वाभिमानाची लक्तरे काढण्याचे काम केले जात असेल तर तो आहे पोलीस विभाग. एखादा व्यक्ती जेव्हा पोलीस विभागात दाखल होतो. त्या वेळेला त्याच्या डोक्यात हे पक्क बिंबवलं जातं की शिस्त आणि साहेब सर्वपरी. मग तो चुकीचा असला तरी देखील. त्यासाठी प्रचलित म्हणी पोलीस खात्यात हेतू तर रुजवण्यात आलेल्या आहे. साहेबांच्या पुढून आणि गाढवाच्या पाठीमागून जाऊ नये, भिंतीला डोकं आपटून भिंतीला नाही आपल्याला त्रास होतो, साहेब म्हणाला बैल गाभण तर बैल गाभण, असं चालायचंच, पोलीस विभागात भरती व्हायला तुम्हाला काही गाडी पाठवण्यात आली नव्हती, कर्मचारी आहे कर्मचाऱ्यांच्या लायकीने रहा. लाचखोरी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे सर्व पोलीस विभागात भरती होणाऱ्या अगदी कुठल्याही पदावरील व्यक्तीच्या मनात ठासून भरले जाते. प्रशिक्षण केंद्राची संपूर्ण यंत्रणा एका तत्त्वावर चालते ते म्हणजे प्रशिक्षणार्थीला सोशिक संयमित आणि गुलाम बनवणे. आणि हे सर्व चालतं ते शिस्त या गोंडस नावाखाली. भ्रष्टाचार हा प्रशिक्षण केंद्राच्या गेटपासून ते ग्राउंड वरच्या मास्तर पासून ते मेस कॅन्टीन वस्तू खरेदी पुरवठा करण्यात आलेल्या साधन आणि सुविधा, रजा घेण्या पासून ते सोयीच्या ठिकाणी ड्युटी लागण्यासाठी देखील अप्रत्यक्षपणे शिकवला जातो. याला नक्कीच अपवाद असतात म्हणूनच त्यांना अपवाद म्हणतात. प्रशिक्षण केंद्रात भ्रष्टाचार कसा चालतो आणि गुलामगिरी मानसिकता कशी स्वतःत विकसित करायची याविषयी तीव्र प्रशिक्षण दिलं जातं.
3 कमी होत चाललेला विभागा विषयीचा आभिमान
सामाजिक स्तरावर लोकांकडून आलेला विरोध, विषमभाव, स्थापत्य वागणूक वरिष्ठ व सहकारी यांच्याकडून होणारा मानसिक व शारीरिक त्रास त्याच बरोबर सिनेमात हेतूत पोलिसांची उडवण्यात आलेली खिल्ली यातून वर्दी विषयी असलेला आत्मसन्मान, स्वाभिमान, अभिमान मागील काळापासून कमी होत चालल्याचं प्रकर्षाने जाणवत आहे. त्यात त्यात उसंतीचा वेळ रजा सुट्ट्या किंवा आपल्यासाठीच शासनाने केलेल्या सवलती मिळवण्याच्या प्रयत्नात असंख्य येणाऱ्या अडथळे हे देखील या मागचे कारण आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रामाणिकपणे जगण्याला असलेली बंधने तसेच चोर चापलूस लाचखोर भ्रष्ट व्यक्तींना विभागात वाढत चाललेला मान व त्यांचे नियंत्रण हे देखील प्रमुख कारण यामागे असल्याचे दिसते आज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त किंवा कुठलाही पुरस्कार वारे वाढ प्राप्त कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला तर प्रकर्षाने हे जाणवेल की त्यांनी केलेले कर्तव्य हे फार विशेष नव्हते अर्थात इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कर्तव्याच्या तुलनेत तुलनात्मक अधिकाधिक कर्तव्य करणारा कर्मचारी चुकणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे त्याला शिक्षा होणारच परंतु कोणताही पुरस्कार विशेषता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करायचा असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला एकही शिक्षा नसणे हा क्रायटेरिया आहे. ज्यात असेच कर्मचारी समोर येतात ज्यांनी कमीत कमी कर्तव्य केले आहे अथवा सेफ ड्युटी केली आहे जी कोठे असते हे सांगायला नको.
4 भीक नको कुत्रा आवर ही मानसिकता
आज पोलीस ड्युटीला निघताना सर्वप्रथम हा विचार करतो की ड्युटी संपल्यानंतर आपण कुठलंही एलीगेशन कुठलाही वाद-विवाद किंवा फिजिकल आणि मेंटल डॅमेज न होता सुखरूप घरी कसे पोहोचू. कारण विभागातूनच नाही तर समाजातून, गाव गुंडांकडून पोलिसाला विविध प्रकारे टार्गेट करण्यात येत. लोकांना नियम शिकवलेले अजूनही भारतात आवडत नाही, लोकांना टोकलेले आवडत नाही आणि तसे जर पोलिसांनी केले तर संबंधित व्यक्ती हा पोलिसांवर खोटे आरोप करायला तसेच अगदी मारझोड करायला देखील मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सामाजिक स्तरावर जनता आणि पोलीस यात सामंजस सहकार्य वाढण्याऐवजी शत्रुत्व वाढल्याचं आज अधिक जाणवते. त्यामुळे अनेक पोलीस ड्युटी करताना भिक नको पण कुत्रा आवर या म्हणीवर आपलं कर्तव्य बजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
5 विभागातील गटबाजी
जर एखाद्या प्रामाणिक पोलिसाने कुठल्या गावगुंडाला, समाजकंटकाला नेत्याला किंवा नियम तोडणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला नियम शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला दमन करण्याचे सर्वप्रथम काम हे विभागातन होते हे सर्वश्रुत आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की काही पोलीस मंडळी ही समाजातील सभ्य व्यक्तींच्या मैत्रीत नसून जुगार, दारू, ड्रग्स अवैद्य धंदे यांना चालवणाऱ्या किंवा यांच्या मालकाशी जळजळ जवळीक असलेले मागील काही काळात निदर्शनास आले आहे. पूर्वी पोलीस आणि समाजकंटक हे वेगवेगळे असत परंतु आज पोलीसच समाजकंटक किंवा समाजकंटकच पोलीस झाल्याचं आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळते. विभागात प्रामाणिक लोकांची संख्या देखील मोठी आहे परंतु अंतर्गत गटबाजी हेवेदावे अनेक आर्थिक व्यवहार यामुळे त्यांना कोणीही साथ देत नाही. बाहेरच्यांपेक्षा पोलिसाला अंतर्गत डिस्क्रिमिनेशनचा अधिक त्रास होतो.
6 वरिष्ठांचा नसलेला आधार, सहानुभूती
जर कुणी प्रामाणिकपणे एखाद्या समाजकंटकाला शासन करायचे ठरवले कायदा शिकवायचे ठरवले आणि त्यांनी तुमच्याशी काही आगळी केली जसे शिवीगाळ मारझोड तर तुम्हाला न्याय समाजाच काय नाही तुमचा विभाग देखील देत नाही त्याचं एकमेव कारण हे की बहुतांश वरिष्ठांना त्यांच्या क्षेत्रात वाद नको असतो आणि वाद नको असल्याच्या मानसिकेतून ते नेहमी विभागातील व्यक्तीलाच ठोकून ठाकून सहन करायला लावण्याची मानसिकता विकसित करण्यावर भर देतात एखाद्या कर्मचाऱ्या विषयी किंवा अधिकाऱ्याविषयी जरी काही आगळीक झाली त्याला मारझोड झाली तरी त्याला विभागातून हवा तसा प्रतिसाद सहानभूती मिळत नाही हे कटू सत्य आहे उलट पक्षी त्यालाच संबंधित समाजकंटकाची माफी मागण्यास भाग पाडले जाते.
7 पोलीस विरोधी कायदे
मानवी हक्क, माहिती अधिकार यासारखे विविध कायदे सामाजिक स्तरावर ज्या प्रमाणात गावगुंड राजकारणी अस्कलितपणे वापरतात तेवढे पोलिसाला देखील वापरता येत नाही आज अतिशय घृणास्पद कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास एक चापट मारण्याचा अधिकार देखील पोलिसास नाही ज्यावेळी गुन्हेगाराला कोर्टमध्ये किंवा न्यायालयात हजर केलं जातं त्यावेळेला न्यायाधीश सर्वप्रथम एकच प्रश्न विचारतात आणि तो म्हणजे पोलिसांनी तुला काही मारझोड केली का आणि त्याने खोटं जरी सांगितलं की केली तर संबंधित पोलिसाचा बळी न्यायालय ज्या प्रचंड वेगाने घेते त्या वेगाने अगदी घृणास्पद कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील शासन करीत नाही त्यामुळे आणि ह्या कायद्यांमुळे पोलीस नेहमी एक पाऊल पाठीमागे टाकीत नोकरी करतो पोलिसावर शासनच नाही तर पोलीस विभाग देखील अनेकदा योग्य शहानिशा न करता ॲक्शन घेते जी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु याचे फ्रीडम गुन्हेगारांना छान मिळते आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावते आज कोणताही गुन्हा केल्यास कितीही पुरावे असल्यास गुन्हेगार कायद्यातील पळवटांचा फायदा घेत एक दोन महिन्यात किंबहुना कधी कधी पंधरा दिवसात देखील जामिनीवर बाहेर पडते आणि गुन्हेगार एकदा बाहेर पडला तर सर्वप्रथम एकच काम करतो आणि ते म्हणजे त्याच्या विरोधात असलेले पुरावे नष्ट करण्याचे बाय हुक बाय क्रूक. इथे एक वाक्य सांगावसं वाटतं आणि ते म्हणजे पोलीस गुन्हेगारांपुढे नाही झुकत पोलीस झुकतो किंवा झुकवला जातो कायद्यापुढे गुन्हेगारांना कायद्याचं बंधन नसतं आणि पोलिसांनी प्रत्येक काम हे कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्याची न्यायालयाची आणि समाजाची देखील अपेक्षा असते जे अतिशय वाईट आहे.
8 सोशल मीडियाचा अतिरेक
सिनेमा सोशल मीडियावर सातत्याने पोलिसांना दाबण्याचे त्यांचे मानसिक शारीरिक दमन करण्याचे त्यांची टिंगल टवाळी करण्याचे व्हिडिओ क्लिप्स प्रसारित केले जातात. पोलिसांना कसा धडा शिकवला, पोलिसांना गल्लीतल्या गुंडाने कसं मारलं, पोलिसांनी कशी लाज घेतली, पोलिसांना कसं पकडून दिलं पोलिसांची समाजासमोर कशी इज्जत काढली याचं चित्रण बटबटीत आणि रंगवून रंगवून चित्तरला जातं अगदी काही वेळा वस्तूस्थिती तशी नसून देखील त्यामुळे पोलिसाला दाबणारा गल्लीतला शेंबडा गुंड देखील तरुणांच्या नजरेत हिरो होतो हे जरी धाधात खोटं असलं किंवा हा बनाव असला किंवा ती केवळ एक क्लिप व्हिडिओ किंवा सिनेमा असला तरी देखील अगदी तसंच करण्याची वृत्ती किंवा कृती ही समाजातील तरुणांमध्ये वृद्धीगत होते आणि ते तसं करण्याचा प्रयत्न करतात देखील आणि कुठल्याही कलोशीत यंत्रणेला पोलीस माणूस हा कमकुवत असणं अधिक फायद्याच असतं. त्या हेतूनेच हे केलं जातं.
9 सर्वसामान्यांचे पोलीस विरोधी मत
आज सर्वसामान्यात पोलीस विषयी एकतर भीती आहे नाहीतर द्वेष त्याला जबाबदार पोलीस विभागात कार्यरत असलेल्या काही कृती जरी असल्या तरी देखील समाजातील आपसापसातील हेवेदावे अधिक कारणीभूत आहेत कारण लोक नियमाने आणि एकमेकाला त्रास न देता जर जीवनव्यापन करीत असेल तर पोलीस हस्तक्षेप करायला स्वतःहून कधीही येत नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पोलीसाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये आरोप करणारा आणि आरोपी यातील एक खोटा असतो आणि पोलिसाला यापैकी एकाचीच बाजू घ्यावी लागते त्यामुळे स्वाभाविक दुसरा एक व्यक्ती हा पोलिसावर नाराज होऊन जातो आणि संधी मिळताच तो पोलिसावर हल्ला करण्यासाठी प्रयत्नशील असतो मग तो फिजिकल असो अथवा मेंटल.
10 काही भ्रष्ट पोलिसांमुळे डागाळते प्रतिमा
काही भ्रष्ट पोलीस वर्दीचा कायद्याचा शासनाने विभागाने दिलेल्या अधिकारांचा अस्खलित गैरवापर करता अनेक गुन्हेगारांना साथ देण्यापासून पाठीशी घालण्यापासून ते त्यांचं साम्राज्य समाज मनावर अधिक काळ आणि अधिक कार्यक्षमपणे असावं यासाठी संबंधित गुन्हेगारांना मदत करता अर्थात काही पैशाच्या मोबदल्यात. त्यात सामाजाची मानसिकता ही नकारात्मक गोष्टींकडे अधिक असल्याने व नकारात्मक गोष्टींची तीव्रता अधिक असल्याने पोलिसांच्या सकारात्मक कामाकडे कुणाचेही लक्ष जात नाही किंवा समाजाची तशी इच्छा देखील नसते त्यात भरीसभर ही भ्रष्ट मंडळी समाजातील रंजल्या गांजलेल्या गरीब दरिद्री लोकांना प्रमाणापेक्षा अधिक त्रास देते आणि त्यातून पोलिसांविषयी असलेला समाजाचा असंतोष वाढत जातो.
लेखक : शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : दि. सेपिअन्स न्यूज
तथा माहिती अधिकार हक्क कार्यकर्ता