लासलगाव : कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्र या मोठ्या कृषी उपयुक्त औषधे, कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्या दुकानास आज रोजी (रविवारी) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे या दुकानात असलेल्या सर्व माल आगीत भस्मसात होऊन मोठी नुकसान झाली. आज रविवार असल्याने हे दुकान बंद होते रविवारी दुपारी अचानक दुकानाच्या पत्र्यातून धूर निघू लागला नंतर या धुराने आगीचे रौद्ररूप घेतले आणि आतील काही रासायनिक औषधांच्या बाटल्या आणि ड्रम फुटून फटाके फुटल्या सारखा आवाज झाला.
आग लागली हे पाहून लासलगाव येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि डि.के. जगताप निरंजन ट्रान्सपोर्ट लासलगाव बाजार समिती यांच्यासह विविध नागरिकांनी स्वतःच्या पाण्याची टँकर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरी आग विझेना, सुमारे अर्धा पाऊण तासानंतर पिंपळगाव, चांदवड, निफाड येथून अग्निशामक दलाचे बंब आल्यानंतर आगीचे प्रमाण थोडे कमी झाले.
यावेळी प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके व औषधांचा साठा असल्याने विषारी वायू हवेत पसरला होता. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही तसेच वित्तीय हानी किती प्रमाणात झाली हे देखील समजू शकले नाही.